दहीहंडीचा सराव सुरू असताना मोटार वेगाने का नेली या कारणावरून झालेल्या वादावादीत तरूण कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रकार गुरूवारी रात्री तासगावमध्ये ढवळवेस परिसरात घडला. संशयितांना तातडीने अटक करा या मागणीसाठी आज तासगावमध्ये बंद पाळण्यात आला. तर पोलीसांनी तातडीने हालचाली करून चार संशयितांना शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.

शिवनेरी मंडळाचे कार्यकर्ते काल रात्री ढवळवेस येथे दही हंडीचा सराव करीत असताना चारचाकी मोटार वेगाने या परिसरातून नेण्यात आली. याबाबत विचारणा करीत असताना वादावादी होउन मंडळाचे अध्यक्ष अनिल बाबासाहेब जाधव (वय ५२) यांच्यावर संशयितांनी सशस्त्र हल्ला केला. यामध्ये जाधव यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ढवळवेस येथील कमलेश तांबेकर, सागर कदम, पवन धनवडे, सुहास अडसूळ , सोहन धनवडे, शितल पाटील व अन्य तीन अशा ९ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पवन धनवडे, सुहास अडसूळ ,सोहन धनवडे व अविनाश तळकिरे या चौघांना पोलीसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले असून अन्य पाच जणांचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

अनिल जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड ह्याप्रकरणी शुक्रवारी तासगाव शहरात उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. बस स्थानक चौकात समर्थक तरुणांनी काही काळ रास्ता रोको केला. सिध्देश्‍वर चौकामध्ये जमलेल्या जमावाने हेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.