सोलापूर : राज्यात कांद्याचा दर प्रचंड प्रमाणावर कोसळल्यामुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रूपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दर कोसळूनही निदान अनुदान तरी पदरात पडण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढविली आहे.

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी विक्रीसाठी राज्यातच नव्हे तर शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातही लौकिक मिळवून आहे. या बाजर समितीमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १५०० रूपयांपर्यंत दर मिळाला होता. नंतर जानेवारीत त्यात पुन्हा घसरण होऊन  कमाल १२०० आणि किमान सरासरी ८०० रूपयांपर्यंत कांद्याला दर मिळत होता. त्यानंतर पुन्हा कांदा दरात घसरण न थांबता सुरूच राहिली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. याच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर कांदा विक्रीतून कष्टाचे पैसे मिळालेच नाहीत. तर उलट व्यापाऱ्यांनाच पदरचे पैसे देऊन रिकाम्या हाताने परतावे लागले होते.

हेही वाचा >>> Maharashtra News : रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात एका शेतकऱ्याला तर अवघ्या दोन रूपयांचा धनादेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले होते. त्यांच्या आंदोलनामुळे रोष नको म्हणून राज्य शासनाला प्रतिक्विंटल कांद्याला ३५० रूपये अनुदान जाहीर करावे लागले. त्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादित अनुदान मिळणार आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसताना निदान अनुदान तरी पदरात पडेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढविली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून बाजारात कांदा आवक वाढली आहे. काल बुधवारी तर तब्बल एक लाख ३५ हजार २०८ क्विंटल कांदा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आला होता. कांद्याला सरासरी ७०० रूपये दर मिळत आहे.  तीन दिवसांपूर्वी ८८ हजार ९८८ क्विंटल तर दोन दिवसांपूर्वी ९३ हजार ५५७ क्विंटल दाखल झाला होता.