मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : दोन महिन्यापूर्वीच धार्मिक दंगलीचे निखारे अनुभवणाऱ्या अमरावती शहरात पुतळय़ांच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यावेळी अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या भूमिका चर्चेत आल्या आहेत. राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर ११ जानेवारीच्या मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. नंतर राणा यांनी पुतळय़ाचे अनावरण केले. हा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात काथ्याकूट सुरू झाला. १३ जानेवारीला रवी राणांनी महापालिका आयुक्तांकडे एक निवेदन सादर केले, त्यात महापौर आणि आयुक्तांनी पुढाकार घेऊन पुतळय़ाला प्रशासकीय परवानगी आणि मान्यता देऊन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचवेळी महापालिकेत एक बैठकही त्यांनी घेतली. आपले महापौरांसोबत बोलणे झाले आहे, पुतळय़ाच्या परवानगीचे सोपस्कार विशेष सर्वसाधारण सभा बोलावून पूर्ण करून घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. पण, पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने तो हटवला जाणार, याची चर्चा सुरू झाली होती.

दुसऱ्या दिवशी राणा यांच्या उपस्थितीत पुतळय़ासमोर आरती करण्यात आली, जयघोष झाला. पुतळय़ाला माल्यार्पण करण्यासाठी महापौर येतील, जिल्ह्याच्या पालकमंत्री येतील, हे राणा यांचे दावे हवेत विरले आणि १६ जानेवारीला पहाटे कडकोट पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी बसविण्यात आलेला पुतळा महापालिकेने हटवला. मुळात, राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींचा पुतळा उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे जानेवारी २०१३ चे अंतरिम आदेश विचारात घेणे आवश्यक आहे. पुतळा उभारावयाचा असल्यास तो स्थानिक लोकांच्या पुढाकारातून आणि लोकवर्गणीतून उभारला जाणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी पुतळा समितीला मान्यता देण्याचे अधिकार असतात. पुतळय़ाची जागा अधिक्रमित केलेली नसावी, कला संचालनालयाची मान्यता घेतलेल्या मॉडेलप्रमाणे पुतळा उभारावा, असे अनेक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या संपूर्ण प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वांकडेच दुर्लक्ष करण्यात आल्याने पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण, रवी राणा यांनी या मार्गदर्शक तत्त्वांविषयी बोलणे सोयीस्करपणे टाळले आहे. राजापेठ येथील उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जावा आणि राजापेठ चौकाला शिवाजी महाराजांचे नाव दिले जावे, अशी मागणी स्थानिक शिवप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून करीत असल्याचे राणा यांचे म्हणणे आहे. मागणी असणे आणि प्रत्यक्ष प्रस्ताव सादर करणे यातील अंतर लक्षात न घेतला गेल्याने पेचप्रसंग उभा झाला आणि पुतळा हटविण्याची नामुष्की ओढवली.

आमदार रवी राणा हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. पण, राणांच्या या कृतीमुळे महापालिकेतील सत्तारूढ भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. रवी राणा हे सातत्याने उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर साहजिकच राणा दाम्पत्याने शिवसेनेला प्रथम लक्ष्य केले. पुतळा हटविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता उपभोगणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श विसरल्याची टीका नवनीत राणा यांनी केली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही राणा दाम्पत्याने आरोप केले. महापालिकेत भाजपची सत्ता आहे आणि तरीही पुतळा हटवला जातो, हे शल्य राणा दाम्पत्याला आहे. देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पातळीवर चांगले काम करीत आहेत, पण स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते पक्षाला बुडविण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप रवी राणांनी केला आहे. पुतळे उभारण्याने अस्मितांची प्रतीके उभी राहतात. समाजमन सुखावते, हे खरे असले, तरी त्यातून थोर विभूतींच्या आदर्शाचे पालन होते का, हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे.

शिवसेनेचे सरकार असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध नोंदवतो. आता काहीही झाले तरी, १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा राजापेठ पुलावर स्थापन केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ युवा स्वाभिमानचे तीनही नगरसेवक राजीनामा देणार आहेत. 

– रवी राणा, आमदार, बडनेरा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrow politics statue religious riots ysh
First published on: 18-01-2022 at 00:37 IST