रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यासाठी सार्वत्रिक निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कुठल्याही पक्षाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतरच उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्य़ातून शेकापचे बाळाराम पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. यावेळी पहिल्यादाच ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात असून बाळाराम पाटील यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे. दोन्ही पक्षांनी शिक्षक

मतदार संघाच्यार निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे . स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे या निवडणुकीच्या  प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे आमदार जयंत पाटील हे देखील अनेक शिक्षण संस्थांशी संपर्क साधून प्रचार करताहेत. दोघेही प्रमुख नेते हे या निवडणुकीच्या  प्रचारात गुंतले असल्यामुळे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा थांबल्याचे दिसून येते.

जिल्ह्य़ात जिल्हा पिरषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शेकाप – राष्ट्रवादी अशी युती राहणार आहे. सोबत आल्यास कॉंग्रेसलाही पायघडय़ा घालण्यापची तयारी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवतीर्थावरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जयंत पाटील व सुनील तटकरे या दोन्हीा नेत्यांचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. परंतु बंडखोरी किंवा फुटीची भीती दोघांनाही आहे. विशेषत: अलिबाग आणि रोहा तालुक्यात एकमेकांना किती जागा देणार, यावर बंडखोरी आणि फुटीचे गणित अवलंबून असणार आहे. रोहा तालुक्यात

राष्टवादी कॉंग्रेसची स्थिती मजबूत आहे तर अलिबागमध्ये  शेकाप बलवान आहे. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखणे हा दोघांचाही संयुक्त अजेंडा आहे. त्यासाठी कॉंग्रेसबरोबर तडजोडीची भाषा सुरू झाली आहे.

एकमेकांना जागा दिल्यास किंवा न दिल्यास बंडखोरी होण्याची भीती दोन्हीत पक्षांना आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार जाहीर करणे पुढे ढकलले जात आहे. त्यासाठी विधान परिषद निवडणुकीचे आयते कारण मिळाले आहे.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.  तर शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे. जिल्हाच परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या  शिक्षणसंस्था आहेत. तर काहींवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीपूर्वी उमेदवार घोषित केल्यास त्याचा परिणाम शिक्षक मतदार संघाच्या  मतदानावर होवू शकतो. अशी भीती दोन्ही पक्षांना वाटते आहे. त्यामुळे शेकाप राष्ट्रवादीच्या

उमेदवार निश्चितीचे घोंगडे ३ फेब्रुवारीपर्यंत भिजत राहण्याची दाट शक्यता आहे.  मात्र त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू असून कोणता निर्णय घ्यायचा हा प्रश्ना त्यांना पडला आहे.

शिक्षक मतदार संघाच्या  निवडणुकीत शिवसेनेला फारशी आशा नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ात शिवसेनेने शिक्षक मतदार संघापेक्षा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करणे पसंत केले आहे.  भाजपानेही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर  लक्ष्य केंद्रीत केले आहे.