सांगली :अपंगत्व म्हणजे अपूर्णता नाही, त्यामुळे कोणतेही विद्यार्थी मागे राहू नयेत, विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ महत्त्वाचा आहे आणि तो चांगला होण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता व रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजावून घेऊन त्यानुसार प्रशिक्षण द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, कै. रा. वि. भिडे शाळा, मिरज व वर्शिप अर्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी आयोजित कृत्रिम बुध्दिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा दिव्यांग व पुनर्वसन अधिकारी श्री. निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, वर्शिप अर्थ फौंडेशनचे दिनेश कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शास्त्र, तंत्र, अभियांत्रिकी शिक्षणाची कवाडे उघडणारा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने वावरण्याची व भविष्यात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रशिक्षण कार्यशाळेत कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी दिनांक २१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीमध्ये रोबोटिक्स व इलेक्ट्रोनिक्स स्मार्ट लॅब श्रवणअक्षम विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी फक्त श्रवणअक्षम विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिलाच अभ्यासक्रम तयार केला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सांकेतिक भाषामध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण शाळा, होम लर्निंग व विशेष शिक्षकांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.