मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह ४० आमदारांनी शिवसेनेत फूट पाडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गट यांच्यात सतत शाब्दीक चकमक घडत आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर समोरा-समोर आले होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांकडे आपली नाराजी बोलून दाखवली होती.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

विधानपरिषदेच्या उपसभापती यांच्या दालनाबाहेर उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर हे आमने-सामने आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे दीपक केसरकरांकडे रोख धरून म्हणाले की, “विधिमंडळच्या आत आणि बाहेर जे काही चाललं आहे, ते योग्य नाही. शाखा ताब्यात घेणं, कार्यालय ताब्यात घेणं शोभत का?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.

“…तर प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजेल”

यावर आज ( १ जानेवारी ) दीपक केसरकरांनी भाष्य केलं आहे. “सध्या नवीन वर्ष आहे, म्हणून मी बोलत नाही. एक दोन दिवस झाल्यानंतर तेव्हाच्या घटनेबद्दल सविस्तर बोलणार आहे. मी बोलेन तेव्हा महाराष्ट्रच नव्हे, तर प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजेल,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.

“बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढा देणारे…”

“ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, याचं उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले, तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही,” असेही दीपक केसरकर म्हणाले.

“मिंधे अन् लाचार होतात, त्यांना…”

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानानंतर आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “घरातून पळून गेलेले उंदीर सांगत आहेत, घर कसं राखायचं. आपलं घर पेटत आहे, असं वाटत असताना घरातील उंदीर पहिले पळाले. दुसरीकडे घरोबा करणाऱ्यांनी सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आणि अधिष्टान दोन्ही घालवलं आहे. त्यामुळे त्यांची गंभीर दखल घेण्याची गरज नाही. जे मिंधे आणि लाचार होतात, त्यांना स्वाभिमानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,” अशी टीका अरविंद सावंतांनी दीपक केसरकरांवर केली आहे.