आमची लढाई हिंदूंशी कधीच नाही, तर समाजात भेदभाव निर्माण करून संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या त्या दहा टक्के वर्गाशी आमचा संघर्ष आहे, असे सांगत एआयएमआयएमचे नेते, खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
सोलापुरात शनिवारी रात्री होटगी रस्त्यावर नई जिंदगी चौकालगत लोकमान्य नगरातील मदानावर खासदार ओवेसी यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी बोलताना खासदार ओवेसी यांनी सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणिशगही फुंकले. व्यासपीठावर औरंगाबादमधील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, पक्षाचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख, अर्जुन सलगर, डॉ. रमेश गावडे आदी उपस्थित होते. सभेला हजारोंचा जनसमुदाय हजर होता. या सभेसाठी पोलिसांचाही मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त होता.
देशात अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला असून ४० कोटी जनता पाण्यासाठी तडफडत आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी परदेश दौरे अणि ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मश्गूल आहेत, अशा शब्दात टीकास्त्र सोडताना खासदार ओवेसी यांनी भाजप सरकार मोदींच्या इशाऱ्यावर नव्हे तर संघाच्या इशाऱ्यावर चालते. त्यांचे संपूर्ण राजकारणच मुस्लीमद्वेषावर चालते. म्हणूनच त्यांच्या राजवटीत मुस्लिमांना दुजाभावाची वागणूक दिली जात असून त्यांचा विकास रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. मुस्लिमांना वेठीस धरू नका, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2016 रोजी प्रकाशित
‘एमआयएम’ची लढाई हिंदूंशी नाही – ओवेसी
खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-05-2016 at 01:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi comment on bjp