गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार आणि नुकतेच मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झालेले आशिष शेलार यांनी वरळीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असून तिथे भाजपानं आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. यावरून सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असून आशिष शेलार यांनी बुधवारी विधानभवनाबाहेरून “आम्ही गड वगैरे काही मानत नाही”, म्हणत शिवसेनेला आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. वरळी हा शिवसेनेचा गड असल्याची प्रतिमा असताना भाजपानं तिथेच लक्ष्य केंद्रीत केल्यामुळे हा कलगीतुरा चांगलाच रंगण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्याचसंदर्भात आज आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

“आम्ही गड वगैरे मानत नाही”

बुधवारी विधानभवनाबाहेर बोलताना शेलार यांनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला होता. “मुळातच गड कुणाचा आणि कुणी ठरवला? आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलारमामांशिवाय कोण करू शकतं? त्यामुळे गड वगैरे आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे हेदेखील भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. युतीमध्ये ते जिंकून आले आहेत”, असं शेलार म्हणाले होते.

दरम्यान, यासंदर्भात आज ट्वीट करताना आशिष शेलार यांनी वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार मुंबईकरच करून दाखवतील, अशा शब्दांत टोला लगावला आहे. “भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय!!” असं आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“ज्या वरळीत सेनेच्या(?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या १०० रूपयांच्या शपथपत्राला ‘बळ’ अपुरं पडतंय…दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय”, असं देखील शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“आम्ही गड वगैरे मानत नाही, स्वत: आदित्य ठाकरे…”, वरळी मतदारसंघावरून आशिष शेलारांचा खोचक टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकीकडे राज्याच्या विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली असताना दुसरीकडे वरळी मतदारसंघावरून भाजपा विरुद्ध शिवसेना असा नवाच सामना पाहायला मिळू लागला आहे.