गेल्या आठ दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर तसंच सदाभाऊ खोत यांनी तर आझाद मैदानावरच ठिय्या मांडलेला आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आज या आंदोलनात हजेरी लावली आणि या संपाला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, “महाराष्ट्रातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब, दीन, दलित, पीडित, शोषित, युवा, महिला, शेतकरी, बारा बलुतेदार आणि सर्वांची सेवा करणारा जर कोणी एक वर्ग असेल तर तो म्हणजे एसटी कामगार. दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, सुखादुःखात कुठेच सहभागी होत नाही. फक्त सकाळी उठतो आणि आपल्या नोकरीला रुजू होतो. माझी नोकरी म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हेच व्रत घेऊन काम करणारे तुम्ही आहात. म्हणूनच तुम्हाला सलाम करायला मी आलोय. ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नसून ही लढाई महाराष्ट्रातल्या दीनदलित, वंचित समाजाला न्याय देण्याची आहे”.

हेही वाचा – एसटी संप: मुंबईत महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी रोखल्याने अनर्थ टळला

ते पुढे म्हणाले, “मागणी आपली सोपी आहे. आम्हाला सुद्धा शासकीय कर्मचारी म्हणून ओळख द्या आणि त्यासाठी एक वाक्याचा जीआर काढा. मीसुद्धा मंत्री राहिलो आहे आणि आधीपासून आत्तापर्यंत एक वकील आहे. शब्द फिरवावे तसे फिरतात. शब्दांचं मायाजाल हे घालावं तसं आहे. आत्ताचं सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी राक्षस जसा असतो, तसं हे सरकार मायावी शब्दात सामान्य माणसाला भुलवण्याचं एक चांगलं स्कील या सरकारकडे आहे. हे मायावी शब्दात तुम्हाला अडकवायला बघतील. मी मायावी यासाठी म्हटलं की हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर”.