महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. या मेळाव्यापूर्वी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच भाजपा नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राज यांच्यासंदर्भात एक सूचक वक्तव्य केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज यांच्याबद्दल बोलताना, ‘राज हे शांत बसणार नाहीत’ असं मत शेलार यांनी व्यक्त केलं आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करूनही त्यांच्या सभांनी लोकसभा निवडणुकीत रंगत आणली होती. दरम्यानच्या काळात राज यांना ईडीने नोटीस दिल्यापासून एकदाही त्यांनी भाजपविरोधात कोठेही टीका केली नव्हती. तसेच मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतही सारेच मौन पाळून होते. तथापि गेल्या आठवडय़ात उमेदवार निवडीबाबत मनसे नेत्यांच्या बैठका पार पडल्या त्याच पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसंदर्भात शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी राज नक्कीच काहीतरी मोठी घोषणा करतील असे संकेत दिले. ‘राज यांच्या व्यक्तिगत स्वभावानुसार ते गप्प बसणार नाहीत असं मला वाटतं,’ असं मत शेलार यांनी नोंदवले. मात्र त्याच वेळी त्यांनी राज यांनी खोटा प्रचार करु नये असा इशाराही दिला. पुढे बोलताना शेलार यांनी ‘खोट्या विधानांवरुन प्रचार करण्याचा राज यांचा विचार असेल तर त्यांना मी इतकचं सांगेन की अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त,’ असा इशारच राज यांना दिला. ‘राज हे किती जागा जिंकतील यापेक्षा ते निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न आहे,’ असे उत्तर शेलार यांनी मनसे किती जागा जिंकेल या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात राज यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खास करुन मोदी आणि अमित शाह यांना हटवण्याचा प्रचार करताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी डिजीटल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाजपावर टीका केली होती. या सभांमधील त्यांचे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे आजच्या मेळ्यामधून स्पष्ट होऊ शकतं. मागील आठवड्यामध्ये मनसे ज्या बैठकी झाल्या त्यानंतर मनसे १०० जागा लढवणार अशीही माहिती समोर आली होती. मात्र त्याबाबत पक्षाकडून तसेच राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच संदर्भातील घोषणा राज आजच्या मेळाव्यात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.