केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम जर होत असेल, तर ते कदापी लोकांना सहन होणार नाही. याचा प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केल्याशिवाय लोक राहणार नाहीत. असा सूचक इशारा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखीमपूर येथील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या महाविकासआघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय, दिल्लीच्या सीमेवर मागील जवळपास दहा महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असून, त्यावर तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “मागील आठ ते दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यावर पोहचण्यापर्यंत. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. शेतकरी विरोधी जे कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, त्याबाबत खूप लोकांच्या मनात रोष आहे, नाराजी आहे आणि कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार अजिबात तयार नाही. त्यामुळे अशाप्रकारचे जे कायदे आहेत, ते तत्काळ थांबवले पाहिजे. चर्चेतून मार्ग काढता आला पाहिजे, त्या ऐवजी लोकाभिमूख नेतृत्व कसं असलं पाहिजे? लोकाभिमूख निर्णय कसे असले पाहिजे? याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज होती. परंतु हे करण्या ऐवजी केंद्र सरकाच्या राज्यमंत्र्यांची मुलं लोकांवर गाड्या चालवतात, अनेक लोक त्यामध्ये मारल्या गेले.”

तसेच, “ही अतिशय गंभीर घटना लखीमपूर परिसरात घडते आणि राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना तिथे जाण्यापासून रोखलं जातं. प्रियंका गांधी यांना अटक केली जाते. मला वाटतं की अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये, अशा वर्तवणुकीतून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम जर होत असेल, तर ते कदापी लोकांना सहन होणार नाही. याचा प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केल्याशिवाय लोक राहणार नाहीत.” असा सूचक इशारा यावेळी अशोक चव्हाण यांनी दिला.

याचबरोबर “उद्याचा बंद महाविकासआघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारलेला आहे. माझी लोकांना विनंती आहे, आवाहन आहे की शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा जो प्रयत्न होतोय, शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यासंदर्भात केंद्र सरकार चालढकल करत आहे. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला उद्याचा बंद करायचा आहे. त्यांचे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, ज्याची सुरूवात बंदच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.” असं देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan warns modi government over farmers agitation msr
First published on: 10-10-2021 at 18:25 IST