महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेकांचे आदर्श आहेत. पण, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा आदर्श आहेत काँग्रेसमधील एक खंबीर नेतृत्व. ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत केलेल्या संवादात त्यांनी राजकारणात येतानाचा आदर्श सांगितला.

“माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कोणत्या पक्षाशी निगडीत होत्या, याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही. मात्र त्या एक महिला म्हणून कर्तृत्ववान होत्या. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळेच त्या माझ्या आदर्श आहेत आणि यापुढेही असतील”, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आदर्श असण्यामागचं कारण सांगताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, “मी शाळेत असल्यापासून इंदिरा गांधी मला आवडायच्या. ज्यावेळी त्यांच्या निधनाचं वृत्त मला समजलं. त्यावेळी माझ्या घरातली, माझ्या जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर गेल्याचं मला वाटलं. त्यावेळच्या भावना मी व्यक्त करु शकत नाही. मात्र त्यांच्या निधनामुळे प्रचंड दु:ख झालं होतं. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्याकडं कुशल नेतृत्व करण्याची क्षमता होती. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात होत्या किंवा त्यांनी कोणत्या पक्षाचं नेतृत्व केलं याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. एक सक्षम महिला म्हणून त्या माझ्या आदर्श आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “कोण अमृता फडणवीस?; त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

शालिनी ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. त्यासोबतच मराठी चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षाही आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी कायमच ठाम भूमिका घेतली. महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या सातत्यानं करत असतात.