अहिल्यानगर : सुपा पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस विभागामार्फतही या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातील माहिती दिली. दरम्यान तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आज किंवा उद्या प्राप्त होईल, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी, बुधवारी चोरीच्या संशयावरून वाळवणे शिवारातील (ता. पारनेर) पवारवाडी येथील ग्रामस्थांनी टोलनाक्यावर पकडलेल्या तरुणाला बेदम चोप दिला आणि मध्यरात्री त्याला सुपा पोलिसांच्या हवाली केले. सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सुप्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोणत्याही आरोपीला, संशयिताला ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. या तरुणाला बेदम मारहाण झाली असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. या संदर्भात सुपा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणात सुपा पोलीस ठाण्याचे अंमलदार बाळासाहेब मासळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत पोलिसांनी त्याला दवाखान्यात जायचे आहे का, असे विचारले. मात्र, त्याने दवाखान्यात जायचे नाही, मला बाहेर सोडू नका, लोक मारतील, असे सांगितल्याचा दावा केला आहे.

सुपा टोलनाका येथील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तरुणाला ग्रामस्थ मारहाण करीत असल्याची घटना कैद झाली आहे. मारहाण झालेल्या तरुणासमवेत आणखी काही जण होते, त्यांचा शोध घेण्यासाठी सुपा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अन्य कर्मचारी गेले होते. तरुणाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले तेव्हा सुपा पोलीस ठाण्यात एक-दोनच कर्मचारी होते व पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थ जमा झालेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांच्या ताब्यातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सुरुवातीला बालाजी रतन राठोड (रा. पांगरी बुद्रुक, मंठा, जालना) असे असल्याचे सुपा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, अधिक चौकशीत त्याचे नाव हितेशकुमार रवीश्वर प्रसाद (वय २६, रा. पनवेल, मूळ रा. उत्तर प्रदेश) असल्याचे आढळले आहे. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल, गुरुवारी सुपा पोलिसांनी हितेशकुमार प्रसाद याच्याविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शरद आबा पवार या वाहतूक व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पवार यांची सिमेंट पाइप कंपनी आहे. या कंपनीमध्ये हितेशकुमार प्रसाद याने चोरीचा प्रयत्न केला. त्याला पकडून सुपा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची फिर्याद आहे.