राहुरी तालुक्यातील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे नेते डॉ. संजय कळमकर यांच्यातील वाद विकोपाला जाऊन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. याच वादातून कळमकर व संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी या दोघांविरोधात नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात धनवे यांच्या पत्नीने (रा. तपोवन रस्ता, नगर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कळमकर यांच्या विरोधात भादंवि ३५४, ३४१, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), (१०) व नागरी हक्क संरक्षण कायदा कलम ७ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक डी. वाय. पाटील करीत आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
आपले पती राहुरी पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपण मुलीसह तपोवन रस्त्याने भाजीपाला आणण्यासाठी जात असताना कळमकर व कुलकर्णी (पूर्ण नाव नाही) दोघे मोटारसायकलवरून आले व आपल्याला थांबवले, कळमकरने तुझे पती सारखे माझ्या शाळेची तपासणी का करतात, असे म्हणून कुलकर्णी याने आपला विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
राहुरीतील प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या काही महिन्यांपासून कळमकर व धनवे यांच्यात वाद सुरू आहेत. तालुक्यातील ७ महिला शिक्षिकांनी धनवे यांच्यावर अश्लील वर्तनाचा व विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. एका शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात धनवे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमकरच महिला शिक्षिकांना पुढे करून आपल्याला त्रास देत असल्याचे धनवे यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrocity and molestation crime registered against kalamkar and kulkarni
First published on: 09-04-2015 at 03:30 IST