कांदा व्यापाऱ्याकडून कोटय़वधीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोफखाना दलातील माजी कर्मचाऱ्यासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, या व्यापाऱ्याकडून याआधी पाच कोटीची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीने नाशिकरोड कारागृहात संबंधितांना हाताशी धरून हे षडयंत्र रचल्याचे उघड झाले आहे. नाशिकरोडच्या एका बिल्डरला खंडणीसाठी मध्यंतरी रवी पुजारीच्या टोळीकडून धमकाविण्याचे प्रकार घडले होते. त्यातही या आरोपींचा सहभाग राहिल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकरोड कारागृहात राहून गुन्हेगारांकडून टोळ्यांची बांधणी करत आपले उद्योग राजरोसपणे सुरू ठेवल्याचे अधोरेखीत झाले आहे.
या घटनाक्रमाची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. डिसेंबर २०१२ मध्ये पिंपळगाव बसंवत येथील नामांकित कांदा व्यापारी करसनदास ठक्कर यांचे बंधू शंकरलाल यांचे टोळक्याने अपहरण करून पाच कोटींची खंडणी वसुली केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्रामीण पोलिसांनी सचिन दामोदर कोल्हे या प्रमुख सूत्रधारासह ११ जणांना अटक केली होती. हे टोळके तेव्हापासून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. दरम्यान एप्रिल २०१३ मध्ये ठक्कर यांच्या भ्रमणध्वनीवर पुन्हा पाच कोटीची खंडणी देण्यासाठी ‘एसएमएस’ आला. नंतर भ्रमणध्वनीवरून धमकावणेही सुरू झाले. आरोपींनी खंडणीची रक्कम तडजोड करत एक कोटीवर आणली. या प्रकाराने भयभीत झालेल्या ठक्कर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पिंपळगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत तपास यंत्रणा सक्रिय झाली. ज्या भ्रमणध्वनीवरून ‘एसएमएस’ व धमक्या दिल्या गेल्या, त्याची छाननी केली असता मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून तो खोटी कागदपत्रे सादर करून खरेदी केली गेल्याचे लक्षात आले. धमकी देणारे संशयित भोपाळ, बैतुल, देवास, नाशिक, सिन्नर याप्रमाणे वारंवार आपली ठिकाणे बदलत होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश येथे वेगवेगळी पथके रवाना करून सिद्धेश्वर उर्फ नाना बालाजी महानूर (२२, मूळ येणेगुर, उस्मानाबाद) याला सिन्नर येथे तर शिवमिलन सिंग रामराज सिंग (३८) यास उत्तरप्रदेशातील इलाहाबाद येथे पोलीस निरीक्षक देविदास शेळके व त्यांच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. शिवमिलन सिंगचे धागेदोरे यापूर्वी ठक्कर यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या टोळक्याशी असल्याचे तपासात उघड झाले.
शिवमीलन सिंग हा पूर्वी नाशिकरोड परिसरात व्यायामशाळा, सुरक्षारक्षक पुरविणे, ठेकेदारांना यंत्रसामग्री भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करत होता. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आले. या गुन्ह्यात तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असताना त्याचे ठक्कर यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा म्होरक्या सचिन कोल्हेशी ओळख झाली. कोल्हेने शिवमिलनच्या मदतीने खंडणीचा हा कट रचला. जामिनावर सुटल्यानंतर शिवमिलन व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सिद्धेश्वरने हे षडयंत्र पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले. खंडणीतून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग हे संशयित कोल्हेच्या जामिनासाठी करणार असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पडवळ यांनी दिली. नाशिक येथील एका बांधकाम व्यावसायिकाला रवी पुजारीच्या टोळक्याने धमकी दिली होती. भ्रमणध्वनीवरून धमकाविण्याच्या त्या प्रकरणातही शिवमिलन सिंगचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पडवळ यांनी सांगितले. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले भ्रमणध्वनी, सीमकार्ड्स, टाटा सफारी जीप, पल्सर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी २० लाखाच्या खंडणीसाठी भ्रमणध्वनीवरून एका व्यावसायिकाला धमकाविणाऱ्या दीपक सुधाकर गांगुर्डे व रागुल उर्फ रघू शेट्टी, जयवंत केदारे यांना अटक केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
कांदा व्यापाऱ्याकडून खंडणीचा प्रयत्न; दोघांना अटक
कांदा व्यापाऱ्याकडून कोटय़वधीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोफखाना दलातील माजी कर्मचाऱ्यासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे. महत्वाची
First published on: 21-05-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to take tribute from onion sellers