शिवसेना सचिवांच्या स्वागताला फरार जिल्हा प्रमुख खांडेंची हजेरी

गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नावे फरार झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असताना शुक्रवारी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वागताला मात्र ते हजर होते.

बीड  : गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नावे फरार झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असताना शुक्रवारी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वागताला मात्र ते हजर होते. पोलिसांच्या उपस्थितीत खांडे जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसून आले. पक्ष नेत्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ते पुष्पगुच्छ घेऊन हजर असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कायद्यापुढे सर्व समान असल्याचे सांगितले जात असले तरी बीडमध्ये मात्र सत्तेची ताकद अनेकांना कळून चुकली.

बीड येथे शुक्रवारी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. खासदार देसाई शहरात दाखल होताच शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी त्यांचे स्वागत केले. जालना रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमातही खांडे मान्यवरांसोबत उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी बीडजवळील इमामपूर येथील गुटख्याच्या गोदामावर प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी छापा टाकल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे नाव पुढे आले होते. याप्रकरणात खांडेंसह चौघांविरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून दोघांना अटक झालेली आहे. खांडे मात्र फरार होते. याचदरम्यान त्यांनी थेट मुंबई गाठून पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्याचे सांगितले जाते. अनिल देसाई नियोजित दौऱ्याप्रमाणे शहरात दाखल होताच सर्वप्रथम फरार जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी त्यांचे स्वागत केले.  तर जालना रस्त्यावरील एका जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या उपस्थितीतही व्यासपीठावर बसून होते.

दिवस भरले

बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा विरोधी गट पुन्हा सक्रिय झाला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून ते जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवली जात आहे. समाज माध्यमातूनही दिवस भरले, आता सर्व बरोबर होईल. झाली ना माझ्या पक्षाची बदनामी अशा प्रकारचे संदेश शिवसैनिकांकडून प्रसारित केले जात आहेत. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून त्यावर कुंडलिक खांडेंचे छायाचित्र टाळले आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक जिल्ह्यात

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना शुक्रवारी जिल्ह्यात होते. वार्षिक तपासणी अंतर्गत ते विविध ठाण्यांना भेटी देऊन आढावा घेणार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीची ते माहित घेत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना गुटख्याच्या प्रकरणातील आरोपी कुंडलिक खाडे कार्यक्रमस्थळी जाहीररीत्या फिरतांना दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Attendance chief khande shiv sena secretary ysh

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या