औरंगाबादमधील जालना रोडवर मोंढा नाका येथे एका रिक्षातून अकरावीत शिकणाऱ्या तरूणीने, रिक्षावाल्याची संशयित नजर पाहून आणि पळवून नेत असल्याचा संशय येताच जीवाची पर्वा न करता धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना आज घडली. गजबजलेल्या जालना रोडवर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडलेला थरारक प्रसंग आहे.

भयभीत अवस्थेत उडी मारल्याने तरूणीला तोंडावर पडली असून तिच्या जबड्याला गंभीर मार लागला आहे. तिला धीर देऊन पालकांना फोन करून, जखमी तरूणीला अॅम्ब्युलन्स हेल्थ रायडर्सचे सदस्य नीलेश सेवेकर यांनी खासगी रुग्णालयात उपचार दाखल केले.

या प्रकरणी जिन्सी पोलिसात तरूणीचा पालकांनी तक्रार दिली असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, जखमी युवती कैलासनगर – संजयनगर येथील रहिवासी असून आज तिचा वाढदिवस असल्याचे पालकांनी सांगितल्याची माहिती हेल्थ रायडर्सचे संदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.