NCP Karmala Baba Jagtap Viral Video : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) करमाळा तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांचा नवा कारनामा समोर आला आहे. बाबा जगताप हे त्यांच्या कार्यालयात बसून धुम्रपान करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये ते सिगारेटऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी वस्तूचा वापर करत असल्याचं दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून अजित पवारांना जाहीर माफी देखील मागावी लागली होती. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पक्षावर पुन्हा टीका होऊ लागली आहे.

माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी मोबाईल फोनवरून कारवाई न करण्यासाठी तंबी दिली होती. अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांचा धुम्रपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

अंजना कृष्णा यांना तंबी दिल्याप्रकरणी अजित पवारांचं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवारांवर टीकेचा भडीमार सुरू झाला होता. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केले, असा आरोप विरोधकांनी केलेला. त्यानंतर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

अजित पवार म्हणाले होते की “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल, तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे.”