शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असताना त्यांनी बँक खात्यातील ५० कोटी रुपये देण्याबाबत मला पत्र पाठवले. लगेच ते पैसे देऊन टाकले. कारण, मला त्यांच्या संपत्ती रस नाही. आम्हाला ५० खोके आणि गद्दार म्हणून हिणवले. पण, हेच महागद्दार आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बच्चू कडू यांनी संवाद साधला आहे. बच्चू कडू म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना गद्दार किंवा खोके म्हणण्याचा अधिकार नाही. कारण, फार कष्टातून आणि मेहनतीतून उद्धव ठाकरे पक्ष चालवत आहेत, असं नाही. बिगर खोक्यांचा त्यांचा पक्ष चालल नसेल.”
हेही वाचा : ५० कोटी रुपये मागितल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ते पैसे…”
“३० वर्षे मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. महापालिकेत काहीच केलं नाही, हे शक्यच नाही. आदित्य ठाकरे हे नेहमी खोके सरकार बोलत असतात. पहिले स्वत:ला तपासून घेत आरोप केले पाहिजेत,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सुनावलं आहे.
विधिमंडळ अधिवेनशानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जातं होतं. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तारादिवशी मी अमेरिकेत किंवा परदेशात असेल, असं मागे सांगितलं आहे. आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आचारसंहिता लागू शकते. नंतर लोकसभा आणि मग विधानसभेची आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही.”