‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. मात्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उद्धव यांना शुभेच्छा देताना राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलग चौथ्यांदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून बच्चू कडू आमदार म्हणून निवडूण आले आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभर सुरु असलेल्या सत्तानाट्यामध्ये बच्चू कडू हे अनेकदा शिवसेना आमदारांच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित राहिले होते. गुरुवारी शिवतिर्थावर पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यालाही ते आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्यातील काही फोटो ट्विटवर पोस्ट करत त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “लोक झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी!, जय महाराष्ट्र” असं ट्विट बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन केलं आहे.

भाजपाने २३ नोव्हेंबरच्या सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केला होता. शुक्रवारी २२ नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील यावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शिक्कामोर्बत केल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर शनिवारी सकाळी अचानक भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला देत भाजपाला सरकारला पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार हा पक्षाचा निर्णय नसून अजित पवार यांचा निर्णय असल्याचे स्पष्ट केलं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन बहुमत नसताना भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा दावा केला होता. यावर रविवारी आणि सोमावारी सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी खुल्या पद्धतीने मतदान घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनेक दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्याला यश आल्याने अजित पवारांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवण्यास असमर्थता दाखवल्याने बहुमत नसल्याचे सांगत फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ७२ तासांमध्ये राजीनामा दिला. यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच सर्व सत्ता नाट्यावर कडू यांनी ट्विटवरुन उद्धव यांच्या शपथविधीचा टायमिंग साधत अगदी एका वाक्यात टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu slams fadanvis on oath taking ceremony of uddhav thackeray scsg
First published on: 29-11-2019 at 15:24 IST