मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. जरांगे-पाटलांनी १७ डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला इशारा दिला आहे.

“सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता केली नाही, तर आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागेल,” असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

बच्चू कडू म्हणाले, “१७ डिसेंबरला जरांगे-पाटील नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत. जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांचा अहवाल सरकारनं दिला नाही. सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर आम्हाला जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१७ डिसेंबरला तुमचा आणि आमचा विषय संपला”

दरम्यान, जरांगे-पाटलांनीही शुक्रवारी ( १५ डिसेंबर ) सरकारला इशारा दिला आहे. “मराठा आरक्षणासाठी सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केली? हे १७ डिसेंबरपर्यंत कळवावे. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करत असल्याचा संशय आम्हाला येतोय. १७ डिसेंबरला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला,” असं जरांगे-पाटलांनी सरकारला ठणकावलं आहे.