राज्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशा दोन प्रमुख आघाड्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळ असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनंही पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्याआधी १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महायुतीतील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

येत्या दोन आठवड्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय देणार आहेत. त्यापाठोपाठ ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रतेसंदर्भातही अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय स्थिती नेमकी कशी असेल? याविषयी आता सामान्य मतदारांप्रमाणेच राजकीय विश्लेषकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात बच्चू कडूंनी केलेलं विधान पडद्यामागील राजकीय घडामोडींबाबत तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बच्चू कडू यांच्या घरी चहापानासाठी जाणार असून त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “१० वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता. तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते. मी आणि आर. आर. आबा त्यांना भेटायला गेलो. तेव्हा शंकरसिंह वस्त्रोद्योग मंत्री होते. त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली. त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिलं. त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करणार का? शरद पवार म्हणाले…

“मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला. आता इथून चाललेच आहेत तर घरी या असं आम्ही त्यांना सांगितलं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं”, असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

महाविकास आघाडीत जाणार का?

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंनी राज्यातील महायुती सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नाराजी किंवा प्रसंगी टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यावर बच्चू कडूंनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. “त्यासाठी सरकारवर टीका-टिप्पणी, नाराजी वगैरे सगळं करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ”, असं थेट आमदार विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचा पक्ष आहे. पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तो आमचा राजकीय सोबती असेल”, असं सांगतानाच बच्चू कडूंनी जर सरकारमधून बाहेर पडायची वेळ आलीच, तर कोणत्या जागांसाठी आग्रह धरणार, याविषयीही भाष्य केलं. “आम्ही एक-दोन जागेसाठी काही करणार नाही. केलं तर तीन-चार जागा घेऊनच महाविका आघाडीकडे जाण्याचा विचार करू. नाहीतर तसं काही करण्यात अर्थ नाही. आणि निवड अमरावतीच का? अनेक मतदारसंघ आहेत. वर्धाही आहे. यवतमाळही आहे. जळगावही आहे”, असं ते म्हणाले.