अकोले: प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कोंभाळणे येथे पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेस भेट देत गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँक प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. राहीबाई यांनी बायफ संस्थेच्या मदतीने देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारत नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे ११४ वाण गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केले आहेत.

या वेळी सर्व बियाणे व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बच्चू कडू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. राहीबाई यांच्याबरोबर विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा करत बीज संवर्धनात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. कोंभाळणे हे डोंगरावर वसलेले गाव असल्याने शेती व दैनंदिन वापराच्या पाण्याची गंभीर समस्या असल्याचे राहीबाईनी सांगितले. गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटना तसेच शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यास मदत करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले.

भेटी दरम्यान बच्चू कडू यांनी बीज बँकेतील संग्रहित बियाण्यांची सखोल माहिती राहीबाईकडून करून घेतली. प्रारंभी राहीबाई यांनी औक्षण करीत पारंपरिक पद्धतीने बच्चू कडू यांचे स्वागत केले. अनेक पारंपरिक आणि नष्ट होत चाललेल्या सांस्कृतिक बाबींबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली.