पंढरपूर : करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर भरलेल्या चैत्री एकादशी वारीसाठी मंगळवारी पंढरी वैष्णवांच्या मांदियाळीने गजबजून गेली. या यात्रेसाठी तब्बल दोन लाख भाविक उपस्थित होते. करोनाच्या साथीमुळे गेले दोन वर्षे पंढरीतील जवळपास बहुतेक मोठय़ा यात्रांवर निर्बंध लादलेले होते. नुकत्याच झालेल्या माघी एकादशीला प्रथमच भाविक पंढरीत दाखल झाले होते.  त्यानंतर होणारी ही पहिली मोठी यात्रा. तसेच करोना निर्बंध संपूर्णपणे हटवल्यानंतर नुकतेच पंढरीत विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. यामुळे यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणेच महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून तब्बल दोन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते.

एकादशीनिमित्त आज सकाळी विठ्ठल रुक्मिणीची पूजा झाल्यावर भाविकांनी प्रत्यक्ष दर्शन घेण्यास सुरुवात केली. ही दर्शनरांग दूपर्यंत गेलेली होती. या दर्शन रांगेतील भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांच्यासाठी खिचडी  आणि चहाची  मोफत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. दरम्यान एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात  द्राक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. या एकादशीला श्री विठ्ठलास पुरणपोळीचा नेवैद्य दाखविला जातो. एकादशी दिवशी भाविकानी चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा आणि दिंडय़ातून हरिनामाचा जयघोष केला. शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी जाणाऱ्या शंभू महादेवाच्या कावडी यनिमिताने पंढरपुरात दाखल झाल्या होत्या.