या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| नीलेश पवार
जिल्हा परिषदेत ७५ टक्के खातेप्रमुखांची पदे रिक्त

नंदुरबार :  नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये ७५ टक्के खातेप्रमुख अधिकाऱ्यांची पदे दोन वर्षांहून अधिक काळापासून रिक्त असल्याने जिल्हा परिषद कशी चालवावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्हा परिषदेत केवळ एकच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हजर असून बाकीची पदे रिक्त आहेत.  आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात येण्यास अधिकारी उत्सुक नाहीत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे या ना त्या डागाळलेल्या अधिकाऱ्याला पदभार देऊन खो खो खेळण्याचा घाट शिक्षण विभागाकडून घातला जातो. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे पदसुद्धा दीड वर्षापासून रिक्त आहे, सुरुवातीला नवापूरचे उपअभियंता आणि आता तळोद्याच्या उपअभियंत्याकडे पदभार देऊन बांधकाम विभागाचा कारभार हाकला जात आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नंतर प्रशासनाच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचे पद असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भूपेंद्र बेडसे यांची थेट ग्रामविकासमंत्र्यांच्या दालनात वर्णी लागली. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनच्या वर्षा फडोळ या विभागाचा वर्षभरापासून अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ पदोन्नतीने वाशीमला अतिरिक्त मुख्य अधिकारी म्हणून गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या ग्रामपंचायत विभागाचा कारभार हा कृषी अधिकारी प्रदीप लाटे यांच्याकडे देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लाटे यांच्याकडे दोन महिन्यांपासून आधीच रोजगार हमी योजना विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कारभार आहेच. अशातच आता लाटे हे कृषीसोबत ग्रामपंचायत आणि रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचे विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत.

दुसरीकडे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सक्तीच्या रजेवर जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तर जिल्हा परिषदेतील द्वितीय क्रमांकाचे पद असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार देखील दीड ते दोन वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपवला गेलेला आहे. या पदावर असणाऱ्या सुनील सोमवंशी यांची दोन वर्षापूर्वी रायगडमध्ये बदली झाल्यानंतर शासनाने या पदावर दुसरा अधिकारी नेमण्याची तसदी घेतलेली नाही. सर्वाधिक कुपोषण असलेल्या नंदुरबार जिल्यातील महिला व बालकल्याण विभागाचे मुख्य अधिकारी यांचा कारभारही दीड वर्षापासून धुळ्याचे प्रभारी अधिकारी चालवत होते. यापेक्षा मोठी बाब म्हणजे महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य आरोग्य अधिकारी यांची उस्मानाबाद येथे बदली झाली. पण त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची नियुक्ती न झाल्याने तळोदा तालुका अधिकारी यांच्याकडे आरोग्य विभागाचा कारभार देऊन या विभागाचे कामकाज चालविले जात आहे.

दीड-दोन महिन्यांपूर्वी समाजकल्याण अधिकारी दोन वर्षांनंतर रुजू झाले. मात्र केवळ तीनच कर्मचारी असल्याने विभागाचे कामकाज कसे चालवावे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहेच. तीन दिवसांपूर्वी सव्वा वर्षाहून अधिक काळापासून रिक्त असलेल्या प्रकल्प संचालकांच्या जागी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती झाली. तर अक्कलकुवा गटविकास अधिकारी यांचा कारभारही अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत चालवला जात आहे.

नंदुरबार पंचायती समिती गटविकास पदाचा प्रभारी कार्यभार हा धडगावच्या साहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे तर धडगावच्या गटविकास अधिकारी पदाचे कामकाज शहाद्याचे साहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडून चालविले जात आहे.

सर्व खातेप्रमुख्यांच्या रिक्त पदांचा ताळमेळ बसवल्यास जिल्ह्यातील प्रमुख विभागांसह जवळपास ७० टक्क्यांहून अधिक खातेप्रमुखांचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडून चालविला जात आहे. वर्षा फडोळ वगळता जिल्हा परिषदेत एकही उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे पुरते बारा वाजले आहे. जिल्हा परिषदेत अनेक कामांमध्ये अनियमितता दिसून येते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास प्रत्येक वेळेस रिक्त पदांचा हवाला देण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backlog of vacancies increased in nandurbar vacancies for heads of departments akp
First published on: 22-09-2021 at 21:44 IST