गडचिरोली : अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली. दिलीप मोतीराम पेंदाम (३४), असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहिवासी आहे.

२१ एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला भामरागड तालुक्यातून संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली. दिलीप हा कट्टर नक्षल समर्थक आहे. नक्षलवाद्यांना रेशन पुरविणे, बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे, अशी कामे तो करीत होता. २१ मार्चला नेलगुंडा-महाकापाडी जंगलातील पायवाटेवर एक क्लेमोर माईन प्रेशर कूकर बॉम्ब पुरून ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यासंदर्भात आणि इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : ‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड

शासनाने त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७८ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

Story img Loader