महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अहमदनगरमधील पाथर्डी येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलीय. यासंदर्भातील निवदेनही पाथर्डी पोलीस स्थानकामध्ये तसेच तहसीलदारांकडे देण्यात आलं आहे.

या आंदोलनामध्ये बहुजन वंचित आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक किसन चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “विरोधी पक्ष नेत्यांची वैचारिक वाढ, वैचारिक जडण घडण रेशीम बागेत झालेले, आरएसएसमध्ये वाढलेले देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक, महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लीम अतीशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून अशी वक्तव्य करतायत. काही कारण नसतानाही शूर वीर योद्धे असणाऱ्या टिपू सुलतान यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं,” असा आरोप चव्हाण यांनी केलाय. तसेच “टिपू सुलतान धर्मांध होते, हिंदूविरोधी होते, हिंदूंवर अत्याचार करत होते, अशा पद्धतीचं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय,” असंही चव्हाण म्हणाले.

पुढे बोलताना, “फडणवीस यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. इंग्रजांना कडवा विरोध, संघर्ष जर कोणी केला तर टीपू सुलतानने केला. हिंदूंची पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं. अनेक समाजउपयोगी योजना त्यांनी राबवल्या,” असंही चव्हाण यांनी टिपू सुलतानच्या कार्याबद्दल बोलताना सांगितलं. “जाणीवपूर्वकपणे फडणवीस यांनी अशापद्धतीचे घाणेरडे आरोप केले. त्यामागील हेतूच एवढा होता की हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण व्हावी, दंगल व्हावी. पण आता बहुजन समाज शहाणा झालेला आहे. आम्हाला बंधूभाव राखायचा आहे. हिंदू आणि मुस्लीम एकत्र आणि गुण्यागोविंदाने नांदताना दिसतानाचे चित्र दिसत आहे. फडणवीस यांचा मनसुबा आम्ही उधळून लावणार. तो आम्ही यशस्वी होणार नाही,” असं चव्हाण म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फडणवीसांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात बहुजन वंचित आघाडी पाथर्डीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं,” असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.