बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव करून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी ठरले आहेत. बीड हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून शरद पवारांनी त्यांच्या विजयाची तुतारी तिथे फुंकली आहे. परंतु, या मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली असून माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे.

“बीडच्या बप्पाचा दादांना फोन. मोठ्या मनाचा दादा”, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे. परंतु, त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नव्हतं. परंतु, पत्रकारांनी त्यांना याबाबत बोलतं केल्यावर त्यांनी बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला होता, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असं म्हटलं आहे.

अमोल मिटकरी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “बजरंग सोनवणे यांनी फोन केला होता, यात तथ्य आहे म्हणून मी सांगतोय. आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत. दादा जनतेचे काम करणारे आहेत. दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. परंतु, त्याला दुसराही अँगल असावा. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.”

हेही वाचा >> Maharashtra News Live Update : “…तर पहिलं आंदोलन शरद पवारांच्या घरापासून होईल”, आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक; राज्यातील सर्व नेत्यांनाही दिला इशारा

काही नेते कलाकार असतात

शरद पवारांशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत. बीड जिल्हा पवारांच्या विचारांचा जिल्हा आहे, असं बजरंग सोनवणे बोलले होते. यावर अमोल मिटकरी म्हणाले, “त्यांच्या सर्व गोष्टी मान्य करू. परंतु, काही नेते कलाकार असतात. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असतं. ओठावरचं बाहेर आलेलं आहे. आता पोटात काय आहे तेही बाहेर येईल.”

“दादांना त्यांनी कशाला फोन केला होता, हे त्यांनाच विचारा. दादांनी त्यांच्याशी १०-१५ मिनिटे चर्चा केली, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. दरम्यान, साखर कारखान्याच्या प्रश्नांसंबंधी त्यांना फोन केला होता असंही मिटकरींनी म्हटलं आहे. परंतु, आगे आगे देखो होता है क्या”, असंही ते सूचकपणे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून अनेक आमदार बंडखोरीच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे अनेक आमदार ठाकरे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचीही चर्चा आहे. त्यातच, बजरंग सोनवणे यांच्याबाबत हे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.