Balasaheb Kharat on Supriya Sule Non Vegetarian Diet : “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला काय अडचण आहे?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. मांसाहारावरून सध्या राज्याच्या राजकारणात गदारोळ पाहायला मिळत आहे. मांसाहारावरून वेगवेगळी वक्तव्ये करणाऱ्या महायुतीतील नेत्यांवर खासदार सुळे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता वारकरी संप्रदायातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की ‘वारकरीच सुप्रिया सुळे यांना उत्तर देतील’. अशातच. ह. भ. प. बाळासाहेब महाराज खरात यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
बाळासाहेब खरात म्हणाले, “मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि माळकऱ्यांच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पांडुरंगाला मांसाहार चालतो असं कुठलाही शहाणा माणूस कधीच म्हणणार नाही. हा पांडुरंगाचा अपमान आहे. हा माळकऱ्यांचा अपमान आहे. आम्हाला सुप्रिया सुळे यांच्याकडून फार काही अपेक्षा नाही. कारण त्यांच्या वडिलांनीच आजवर कधी पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकवल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना काय बोलावं यासाठी मला शब्दच सुचत नाहीयेत. त्यांना शृपनखा म्हणावं का? परंतु, असा कुठलाही शब्द वापरला तर त्या शब्दाचाच अपमान होईल.” खरात हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“वारकरी सुप्रिया सुळे यांना धडा शिकवतील, मी स्वतः…”
बाळासाहेब खरात म्हणाले, “सत्तेसाठी ही मंडळी कुठल्याही थराला जातील, वाचाळवीरांसारखं काय बोलतील हे आपण सांगू शकत नाही. आम्ही पांडुरंगाचा अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी यापुढे असं वक्तव्य केलं तर सगळे वारकरी त्यांना धडा शिकवतील. मी स्वतः देखील काहीही करू शकतो. मी माझ्या पांडुरंगाचा, माझ्या संप्रदायाचा अपमान सहन करणार नाही. कारण मी ज्याचं खातो त्याचाच गातो, मी पुढाऱ्यांचं गाणं गाणार नाही.”
खरात म्हणाले, “मला सुप्रिया सुळे यांना सांगायचं आहे की तुम्ही कितीही मोठ्या राजकारणी असला तरी तुम्ही आमच्या आराध्य दैवतांचा अपमान करू शकत नाही. ही मंडळी अशी वक्तव्ये का करतात हेच कळत नाही. त्यांनी या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्यावं, नाहीतर वारकरी संप्रदाय त्यांच्याविरोधात आंदोलनाच्या तयारीत असेल हे लक्षात ठेवावं.”