कोकणातील महत्वकांक्षी चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विमानतळ निर्मितीत योगदान असलेल्या व्यक्तींची यादीच सांगितली. यात त्यांनी माधवराव शिंदेंपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. “१९९२ मध्ये माधवराव शिंदे यांनी चिपी विमानतळाची संकल्पना मांडली आणि जागेची पाहणी केली. त्यानंतर मनोहर जोशी यांनी हे काम पुढं नेलं,” अशी माहिती थोरात यांनी दिली. तसेच या कामात यूपीए सरकारचं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं.

बाळासाहेब थोरात म्हटले, “आपण आज एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत. आजचं उद्घाटन म्हणजे उज्वल भविष्याची सुरुवात आहे. खासदार विनायक राऊत यांनी प्रास्ताविकातच सांगितलं की १९९२ मध्ये माधवराव शिंदे यांनी चिपी विमानतळाची संकल्पना मांडली. जागेची पाहणी केली. त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हे काम आणखी पुढं गेलं. यूपीएच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अनेक गोष्टींची त्यात भर पडली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) काम करत आहे. एमआयडीसी आणि भारत सरकारच्या माध्यमातून आज हे काम पुढं जातंय. ज्यांचं या कामात योगदान आहे त्यांचं कौतुक करण्याचा, स्मृती जपण्याचा हा सोहळा आहे.”

“आपण एका समृद्ध कोकणाचं स्वप्न पाहतो. कोकण समृद्ध आहेच, निसर्गाने कोकणाला खूप देणगी दिलीय. फळं दिले, फुलं दिले, वनराई, समुद्र दिलाय. पहिला मान्सून पाऊस आल्यावर कोकणाच्या मातीचा पहिला सुगंध येतो हे कोकणाचं वैशिष्ट्यं आहे. पर्यटनाला सर्वाधिक कुठं वाव असेल तर तो कोकणात आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री झाले तेव्हापासून ते काय नवं करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. जगातील समृद्धी कोकणात आणायची असेल तर त्यासाठी पर्यटनाचा उपयोग होऊ शकतो. त्यात अनेक रोजगाराच्या संधी आहेत. आजची सुरुवात कोकणासाठी नव्या युगाची सुरुवात आहे. कोकण समृद्ध होणार आहे,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का? चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंची राज्य सरकारवर तोफ

“नवी मुंबईचं विमानतळ लवकरच होतंय. तेथे नवं जग उभं राहत असल्याचं सिडकोचं प्रेझेंटेशन पाहायला मिळालं. या बाजूला चिपी विमानतळ झालंय, कोकण रेल्वेनं जोडलंय, मुख्यमंत्र्यांनी कोस्टल महामार्गाची संकल्पना मांडलीय. यामुळे कोकण समृद्ध होईल. रोजगार तयार होईल,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.