राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील गणेश साखर कारखान्यावरून राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केले. “विखेंनी १० वर्षे कारखाना स्वतःकडे ठेऊनही सुरू केला नाही. आता गणेश साखर कारखान्यावर एकाच दिवशी बैठकीची नोटीस देण्यात आली, त्याच दिवशी बैठक आणि लगेच करार वाढवून घेण्यात आला,” असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा आग्रह असल्यामुळे मीही त्यात थोडा सहभाग घेत आहे. हा कारखाना १० वर्षे राधाकृष्ण विखेंच्या ताब्यात होता. परंतू त्यानंतरही कारखान्यात काहीही प्रगती झाली नाही. १० वर्षांनंतरही कारखाना सुरू झाला नाही. काही तरी गाळप करायचं आणि त्यानंतर थांबायचं हाच प्रयत्न सातत्याने झाला.”
“निवडणूक होत असल्याचं पाहून करार वाढवला”
“या कारखान्याची निवडणूक सुरू असताना पुन्हा एकदा कराराचा निर्णय घेऊन करार वाढवला जात आहे. मागील वर्षी विखेंनी स्वतःहून हा करार थांबवला होता. आता निवडणूक होत असल्याचं पाहून पुन्हा हा करार वाढवला जात आहे. हे योग्य नाही. प्रसंगी कारखान्याचे सभासद न्यायालयातही जातील,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
“विखे मोठी माणसं आहेत”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “विखेंनी गणेश साखर कारखाना चालवायला घेतला होता. तेव्हा आमची अपेक्षा होती की, विखे मोठी माणसं आहेत, ते मोठ्या कारखान्याचे चालक आहेत, त्यामुळे गणेश कारखानाही ते निश्चितपणे चांगला चालवतील. त्यातून गणेश कारखान्याला एक चांगलं आर्थिक जीवन देतील. मात्र, दुर्दैवाने १० वर्षात काहीही घडलं नाही.”
हेही वाचा : साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने
“त्यांना कारखाना बंदच ठेवायचा आहे का?”
“आता आणखी वर्षे वाढवून घेईन हे काय करणार आहेत. त्यांना कारखाना बंदच ठेवायचा आहे का अशी शंका येणं साहजिक आहे. निवडणूक थांबलेली नाही. कारखान्याचे सभासद निर्णय देतील आणि ते संचालक मंडळ तिथे येईल. निवडणुकीनंतर वज्रमुठचंच संचालक मंडळ येईल, याची मला खात्री आहे,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.