सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हयांतून दोन कंटेनर भरून माणगा बांबूचे फर्निचर इस्रायल देशात यशस्वीरित्या निर्यात करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील कोनबॅक (Konbac) आणि चिवार (Chivar) या स्थानिक संस्थांनी हे दर्जेदार फर्निचर बनवून ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशाबद्दल बोलताना कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव कर्पे यांनी विश्वास व्यक्त केला की, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा बांबूचे एक मोठे जागतिक प्रक्रिया केंद्र म्हणून उदयास येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या बांबूचे उत्पादन होते. याच भागात कोनबॅक आणि चिवार या बांबू प्रक्रिया क्षेत्रातील नावाजलेल्या संस्था आहेत. कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव कर्पे यांनी माहिती देताना सांगितले की, “चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या जागतिक स्पर्धकांना मागे टाकून आम्ही ही ऑर्डर मिळवली, याचा आम्हाला अभिमान आहे.”

हे काम अत्यंत आव्हानात्मक होते. ग्राहकांना फर्निचरमध्ये त्याचा नैसर्गिकपणा टिकवून सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक रचना हवी होती. “आम्ही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली नाही. ग्राहकाच्या अपेक्षेनुसार आणि वेळेत काम पूर्ण केल्यामुळे ते आमच्या कामावर समाधानी आहेत,” असेही श्री. कर्पे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलमध्ये सध्या युद्धजन्य गंभीर परिस्थिती असतानाही, कोनबॅक आणि चिवार संस्थांनी हे धाडस करत दोन कंटेनर फर्निचरची यशस्वी निर्यात केली. या यशामागे त्यांची संपूर्ण टीम, कारागीर यांचे अथक परिश्रम आणि चिवार संस्थेचे प्रयत्न कारणीभूत असल्याचे श्री. कर्पे यांनी सांगितले. त्यांच्या मते, ही फक्त सुरुवात असून, येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बांबूच्या जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करेल.