दयानंद लिपारे, कोल्हापूर

उन्हाच्या झळा वाढल्याने केळीच्या दरात लक्षणीय प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे उसाकडून केळीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. प्रतिटन १० हजार रुपये असलेला केळीचा दर ६ ते ७ हजाराच्या आसपास आला आहे. अपेक्षित नफ्यापेक्षा सुमारे ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. मे महिन्यांत उन्हाळा आणि रमजान महिना यामुळे दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवली जात आहे. किरकोळ बाजारात आणि फिरत्या विक्रेत्यांकडील दर स्थिर असल्याने ग्राहकांना मात्र याचा काहीच फायदा होताना दिसत नाही.

पश्चिम महाराष्ट्र हा उसाचा पट्टा. उसाच्या मळ्याचे गणित जमत नसल्याने आणि वेगळे उत्पादन म्हणून अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोल्हापूर उसाच्या बरोबरीनेच केळीच्या उत्पादनात अग्रेसर जिल्हा बनला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था असल्याने  बागायती क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे केळीच्या बागा मोठय़ा प्रमाणात फुलल्या आहेत.

केळीचा दर स्थिर नसतो. तरीही दराची बऱ्यापैकी हमी असल्याने शेतकऱ्यांचा केळीकडे ओढा राहिला आहे. साधारणत: १० ते १२ रुपये प्रतिकिलो दर मिळत असतो. यंदा मात्र दरात घसरण झाली आहे. चांगल्या दर्जाच्या केळीला डिसेंबर महिन्यात प्रतिकिलो १२ रुपयांचा दर होता. म्हणजे प्रतिटन १० ते १२ हजार रुपये. केळी उत्पादनाचा खर्च टनामागे आठ हजार रुपये आहे. मात्र, अलीकडे केळीच्या दरात घसरण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  कुंभोज येथील केळी उत्पादक आशिष चौगुले यांनी सांगितले की, ‘यंदा कमी पर्जन्यमानामुळे पिकाची परिपक्वता लवकर झाली असल्याने घाउक बाजारपेठेत केळीची आवक वाढली आहे.  सध्या केळीला टनामागे ६ हजार रुपये इतका कमी दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तापमान वाढीमुळे घड टिकत नाहीत. त्यामुळे केळी काढून विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, दुसरीकडे पाण्याची उपलब्धता नसलेल्या भागात ‘जैसे थे’ स्वरूपात विक्री केली जात असल्याने आवकआणखी वाढल्याने दर घसरले आहेत, असे त्यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर, कुंभोज येथील केळी उत्पादक शिवकुमार पाटील यांनी चांगल्या प्रतीच्या केळींना मागणी आणि दर चांगला असल्याचे सांगितले. साठ ते आठ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रमजान पावणार : एक-दोन महिन्यात केळीचे दर वाढतील असा अंदाज केळी व्यापाऱ्यांचा आहे. याबाबत सलमान बागवान यांनी सांगितले की, उन्हाळा वाढू लागेल तशी केळीची आवक कमी होईल. तसेच मे महिन्यात रमजान सुरु होणार आहे. या काळात चांगला माल आखाती देशात मोठय़ा प्रमाणात निर्यात होतो. याचा परिणाम म्हणजे मे महिन्यात केळीच्या दरामध्ये वाढ होणार आहे.