‘हनीट्रॅप‘ प्रकरण; बापू सोनवणेला अटक

नगर: ‘हनीट्रॅप‘ प्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांनी बापू सोनवणे (हिंगणगाव, नगर) याला आज, गुरुवारी अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात आत्तापर्यंत महिलेसह चौघांना अटक झाली आहे. सोनवणे याची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच महिलेच्या घरातून कागदपत्रेही जप्त केली आहेत.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडीओ तयार करून, खंडणी मागणे तसेच लुटण्यात आल्याचे दोन गुन्हे नगर तालुका पोलिसांनी महिलेसह तिच्या टोळीविरुद्ध दाखल केले आहेत.

एका गुन्ह्यत कल्याण रस्त्यावरील व्यावसायिकाकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागून ५ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला, तर दुसऱ्या गुन्ह्यत परिवहन सेवेशी निगडित एका अधिकाऱ्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागून त्याच्याकडील ८० हजार रुपयांचा ऐवज लुटण्याचा आला. या प्रकरणाचा तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.

या प्रकरणातील महिलेसह तिचा साथीदार अमोल मोरे या दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, गुरुवारी संपत होती. या महिलेचे दोन मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

आज अटक करण्यात आलेला बापू सोनवणे, सचिन खेसे, अमोल मोरे तसेच महेश बागले व खरमाळे हे चौघे महिलेचे साथीदार आहेत. महिलेच्या (जखणगाव, नगर) घरात लपून शरीरसंबंधाचे अश्लील व्हिडीओ तिचे साथीदार तयार करत तसेच तो पोलिसांकडे देण्याची धमकी देऊन मारहाण करून सावजाकडील ऐवज लुटत असत.

दोघे आरोपी फरार

तिने गुन्ह्यसाठी कोणाकोणाशी संपर्क केला, तिच्या बँक खात्यांचा तपास करण्यासाठी कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार दोघांच्या कोठडीत दि. २४ पर्यंत वाढ करण्यात आली. या प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यत सचिन खेसे (हमीदपूर, नजर) याला  अटक करण्यात आली. त्याला दि. २२ पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याशिवाय महेश बागले व सागर करमाळे हे दोघे आरोपी फरार आहेत.