अकोले (जिल्हा नगर) तालुक्याच्या उत्तर भागातील ऐतिहासिक विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ल्यावरील एका गुहेत दोन धान्याची ऐतिहासिक कोठारे सापडली आहेत. विशेष म्हणजे त्या कोठारांमध्ये सुमारे ५० पोते नागली, वरई असे धान्यही सापडले आहे. हे धान्य शिवकाळातील असावे असा अंदाज व्यक्त होतो.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला विश्रामगड हा अकोल्यातील एकमेव किल्ला. सुमारे तीन आठवडे या गडावर महाराजांचे वास्तव्य होते. मागील वर्षभरापासून पट्टाकिल्ला विकासाची विविध कामे सुरू आहेत. किल्ल्यावरील एक नंबरच्या गुहेत सफाई सुरू असताना ऐतिहासिक दोन धान्याची कोठारे सापडली. अनेक वर्षे वापरात नसल्यामुळे ही गुहा मातीने भरून गेली होती. वन खात्याच्या वतीने गुहेची सफाई करण्यात आली. त्यानंतर गुहेत दोन सुमारे दीड फूट-अडीच फूट आकाराचे दगड झाकणासारखे बसविल्याचे आढळले. हे दगड बाजूला केले असता खाली सुमारे चौदा फूट खोल कोठारे आढळली. या कोठारांमध्ये तळाला दगडी रांजणांसारख्या आकारात वरई, नागली असे धान्य भरलेले आढळले. हे धान्य ओळखता येत असले तरी बाहेर काढल्यानंतर हवेशी संपर्क येताच त्याची माती होते. शिवाजीमहाराजांच्या काळात या गडावर माणसांचे वास्तव्य होते, तेव्हा त्यासाठी ही कोठारे ठेवण्यात आली असावीत. गडावर अजूनही अशी कोठारे सापडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barn found on patta fort of shiva era
First published on: 01-01-2015 at 03:40 IST