राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढत ड्रिलिंगचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. या कामाला जोरदार विरोध करणाऱ्या ११० ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये बहुसंख्य महिला आहेत. मात्र या प्रकरणी गेल्या रविवारी अटक करण्यात आलेले सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांची पुढील दोन आठवडे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या शर्तीवर जामीनावर मुक्तता करण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह‌ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनी प्रकल्प विरोधी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी संध्याकाळी संवाद साधला. यावेळी देवेंदर सिंह‌ म्हणाले की, प्रकल्प विरोधकांचे म्हणणे ऐकून, विश्वासात घेऊनच प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. येत्या गुरूवारी या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत राजापुरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विरोधकांनी मते मांडावीत, त्यांच्या शंका किंवा प्रश्नांची योग्य उत्तरे दिली जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा करताना स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसिलदार शितल जाधव उपस्थित होत्या.

बारसू परिसरात प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक प्राथमिक कामाला गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवर जोरदार विरोध केला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांनी तीव्र विरोध करुन बंद पाडले. म्हणून या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामालाही विरोध होणार, याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या रविवारपासून बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तरीसुद्धा ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर बारसूच्या सड्यावर ठिय्या मांडला.काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आले. मात्र आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला. प्रशासनानेही सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा या परिसरात तैनात केला.

सोमवारी कोणतीही कारवाई झाली नाही. मंगळवारी सकाळपासून मात्र येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस बंदोबस्तात काही खासगी गाड्या येत असल्याचे दिसल्यावर महिलांनी बारसू सडा येथील रस्त्यावर लोळण घेत गाड्या रोखल्या. पण यावेळी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत ११० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि आधीच तेथे आणून ठेवलेल्या एसटी गाड्यांमध्ये बसवून रत्नागिरीत आणले. तसेच घटनास्थळी वार्तांकन करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनाही तेथून हुसकावून लावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे मंगळवारी पोलीस बळाचा वापर करून ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असले तरी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लगेच मावळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील काही दिवस या परिसरात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.