काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील दाम्पत्याने केज नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ८ जागा जिंकून आपली राजकीय पत कायम राखली. मात्र, बहुमतासाठी एका अपक्षाला ‘हात’ जोडावा लागणार आहे. स्थिती अनुकूल असूनही अंतर्गत बंडाळीने भाजपला ५, तर राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या एका उमेदवाराला केवळ एका मताने पराभव पत्करावा लागला. पाटील दाम्पत्याचे वारस आदित्य पाटील सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले.

केज नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी झाली. काँग्रेसने सर्वाधिक ८, तर भाजपने ५ व बंडखोर एक, तर राष्ट्रवादीने २ व बंडखोर एक जागा मिळवली. देशभर सार्वत्रिक निवडणुकीतील मोदी प्रभावाने छोटय़ा-मोठय़ा निवडणुकीतही काँग्रेसची दाणादाण उडत असताना केजमध्ये मात्र पाटील दाम्पत्याच्या नेतृत्वाखाली पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र, बहुमतासाठी एका अपक्षासमोर हात जोडावे लागणार आहेत.
पाटील दाम्पत्य काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर नेतृत्व करते. अडीच वर्षांपूर्वी गावच्या नगरपंचायतीची सत्ता ताब्यात आल्यानंतर या निवडणुकीत तळ ठोकून त्यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या. जिल्ह्यात सर्वत्र भाजपचे वर्चस्व निर्माण झाले असताना केज नगरपंचायत निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे राजकीय स्थिती अनुकूल असताना केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मतदारसंघाच्या आमदार प्रा. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, हारुण इनामदार, रमाकांत मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज पक्षात असताना वाद न मिटल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समर्थक जि. प. शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. परिणामी तब्बल २५ वष्रे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे दिवंगत विमल मुंदडा यांचे पुत्र अक्षय व त्यांचे समर्थक बाजूला राहिल्याने पक्षाला २ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे संतोष लांडगे केवळ एका मताने पराभूत झाले. पाटील दाम्पत्याचे वारस आदित्य पाटील सर्वाधिक ७३३ मते घेऊन विजयी झाले. विजयी उमेदवारांत महादेव लांडगे, पशुपतीनाथ दांगट, रविराज अंधारे, विद्या पाटील, अश्विनी गाढवे, हारुण इनामदार, दीपाली डोंगरे, अर्चना हजारे, शरमील बेगम इनामदार, रेश्मा इनामदार, खदरोद्दीन इनामदार, सोहरा बेगम इनामदार, मालती गुंड, मुक्ता मस्के, मुजस्सीरगफार तांबोळी व मेहबुबमियाँ इनामदार यांचा समावेश आहे.