मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली. मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अखंडित अतिवृष्टीने पिके उध्दवस्त झाली आहेत. गावा-गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणचे पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धनेगाव (ता.केज) येथील मांजरा धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर माजलगाव धरणातूनही सिंदफना नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात मंगळवार (२८ सप्टेंबर) पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सिंदफना नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बीडमधील बिंदुसरा नदी दुथडीभरून वाहू लागली आहे. धनेगाव (ता.केज) येथील मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. मांजराचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे. केज जवळील तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेल्याने अंबाजोगाईकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या असून कळंब-अंबाजोगाई रस्त्यावरील सावळेश्वर पैठण येथील पुलावरून पाणी गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील बंद झाली आहे. याचबरोबर केजमधील इस्तळ हे गाव जलमय झाले असून, या गावाचा अन्य गावांशी संपर्क देखील तुटला आहे.
मराठवाड्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला!
अंबाजोगाईतील भोई गल्ली, मोची गल्ली व पंचशील नगर भागासह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी भीतीपोटी रात्र जागून काढली. आवरगाव (ता.धारूर) येथील वाणगंगा नदीतून चारचाकी वाहन वाहून थेट सोयाबीनच्या शेतामध्ये अडकले होते. ग्रामस्थांनी पहाटे दोन वाजता वाहनांतील तिघांना वाचविले. रेवकी (ता.गेवराई) येथील विद्रुपा नदीला पुर आल्याने पाणी गावात शिरले आहे. रेवकी-देवकीला जाणारा पुल देखील पाण्यात गेला आहे. भोजगाव, राजापुर, राहेरी (ता.गेवराई) अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.