कर्नाटक शासनाच्या दडपशाहीच्या विरोधात सोमवारी बेळगाव, निपाणी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान येळ्ळुर येथील मारहाणीबाबत केंद्रीय मानव अधिकार आयोगाने येळ्ळुर ग्रामस्थांची तक्रार दाखल करून घेतली आहे.
येळ्ळुर गावातील महाराष्ट्र राज्य नावाचा फलक शुक्रवारी कर्नाटक शासनाने काढून टाकला. तर दुसऱ्याच दिवशी तेथील ग्रामस्थांनी हा फलक पुन्हा उभारला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्नाटक प्रशासनाने रविवारी येळ्ळुरमधील तो फलक पुन्हा काढून टाकला. शिवाय येळ्ळुर गावातील आबालवृद्ध मराठी भाषकांना अमानुष मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसात सीमाभागात उमटले. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव व निपाणी शहरात सोमवारी बंदचे आवाहन केले होते. बेळगावातील मराठी भाषकांची ताकद पुन्हा एकवटणार हे लक्षात आल्यावर बेळगाव जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर बंद मागे घेण्यासाठी मोठा दबाव आणण्यास आला. तथापि तो न जुमानता दळवी यांनी हा निर्णय एकीकरण समितीचा असून त्याप्रमाणे कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट केले होते. सोमवारी बेळगाव, निपाणी या शहरातील व्यवहार सकाळपासूनच ठप्प होते. बस सेवा व रिक्षा यांची वाहतूकही थंडावली होती. मराठी भाषकांच्या सहभागामुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धारवाड खंडपीठामध्ये येळ्ळुर गावातील फलक उभारणीची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आपल्या आदेशवरून फलक काढला होता पण तो पुन्हा उभारला गेला, अशी घटना होत राहिल्यास कोणती भूमिका घेणार अशी विचारणा कर्नाटक शासनाकडे केली आहे.
कारवाई आणि नवे फलक
येळ्ळुर पाठोपाठ बाची, बीके कंग्राळी या दोन गावांतील जनतेने उभे केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य’ नावाचे फलक कर्नाटक पोलिसांनी आज काढून टाकले. तर दुसरीकडे सीमाभागातील आणखी काही गावामध्ये आज महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असलेले फलक उभारून मराठी भाषकांनी कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे. सोमवारी िहडलगा, डिसुर, बाची आदी गावांमध्ये फलक उभारण्यात आले असून आता हा आकडा डझनावर पोहचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belgaum bandh over yellur issue
First published on: 29-07-2014 at 03:34 IST