संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या भंडाऱ्यातील मुरमाडीच्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूचे गूढ ५३ दिवस उलटल्यानंतरही उलगडण्यात पोलीस खात्याला सपशेल अपयश आले आहे. तीन मुलींची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले होते. गेल्या महिन्यातील फॉरेन्सिक अहवालाने बलात्कार झालाच नसल्याचा निष्कर्ष काढल्याने यातील गुंतागुंत वाढली आहे.
 तीनही मुलींच्या १५ फेब्रुवारीच्या दुपारी तीन वाजेपर्यंतच्या अस्तित्वाच्या नोंदी पोलिसांना मिळालेल्या आहेत. या दिवशी मुलींना दुकानात जाऊन खाऊ विकत घेणे, मैत्रिणीकडे जाणे, मामाने बोलाविणे या नवीन बाबी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे हा नवीन मामा कोण याची चौकशी सुरू झाली आहे. मुलींच्या आईचीही पोलिसांनी कसून चौकशी केली तरीही त्यातून फारसे काहीच निष्पन्न होऊ शकले नाही.
तिन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना फॉरेन्सिक तज्ज्ञ असणे आवश्यक होते. मात्र, फक्त पदविका उत्तीर्ण असलेल्या दोघांची शवविच्छेदनासाठी मदत घेण्यात आली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून मुलींच्या मृत्यूचे कारण कळू शकले नव्हते. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उल्लेखच नव्हता. मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सदर प्रकरणाचा छडा लावण्याचे केवळ दावेच केले .
 हैदराबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर यातील गुंतागुंत उलगडेल, असे सांगितले जात असले तरी शवविच्छेदन अहवालावर स्थानिक सरकारी इस्पितळातील डॉक्टर ठाम आहेत. सीआयडीच्या पथकांनीही या प्रकरणाची समांतर चौकशी केली आहे, परंतु अद्याप सदर प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे तिन्ही मुलींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.