राज्यात व सत्तेतही शिवसेनेला भाजपची गरज नाही. भाजपलाच शिवसेनेची गरज भासते, असे आक्रमक मत व्यक्त करतानाच शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी आपल्याला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये पुन्हा नवा जोश, जोम निर्माण करायचा आहे, असेही स्पष्ट केले.
शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाऊ कोरगावकर यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर ते प्रथमच नगरला आले होते. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषदेत वरील मत व्यक्त केले. या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे व राजेंद्र दळवी, महिला संघटक सुजाता कदम, नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, नगर शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते. कोरगावकर हे चेंबूरमध्ये (मुंबई) पूर्वी पक्षाचे विभागप्रमुख होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते व येथील शिवसैनिकांत आपण दुवा म्हणून काम करू. जे चुकीचे आहे ते आपण निर्भीडपणे ठाकरे यांच्यापुढे मांडू. आपल्याला येथे ‘समन्वयक’ म्हणून काम करायचे आहे. पंधरा दिवसांनंतर आपण प्रत्येक तालुक्याचा दौरा करून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊ व ठाकरे यांच्या निदर्शनास आणू. प्रथम प्रश्न समजून घेण्याची आपली भूमिका आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी काही प्रस्ताव मांडल्यास तो संबंधित मंत्री व पक्षप्रमुखांकडे पोहोचवू. मतदारसंघात आपल्याला सूक्ष्म पद्धतीने काम करून पक्षसंघटनेची बांधणी करायची आहे, असे कोरगावकर म्हणाले.
सेना सत्तेतही आहे व विरोधही करते, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की उद्धव ठाकरे जे चुकीचे आहे, ते निर्भीडपणे मांडतात. आम्ही सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्ता सावरण्यासाठीच भाजपने सेनेला पाचारण केले आहे. नगर जिल्हय़ात सहकार सम्राटांविरुद्ध लढण्यासाठी शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जाईल, संघटनात्मक समन्वय निर्माण केला जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
प्रत्येक तालुक्यात एक चेंबूरकर
मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याची माहिती घेण्यासाठी आपण चेंबूर येथून प्रत्येक तालुक्यातील एक शिवसैनिक बरोबर आणला आहे. त्यांच्यामार्फत माहिती घेतली जाईल, असे भाऊ कोरगावकर यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. पत्रकार परिषदेला उपनेते अनिल राठोड अनुपस्थित होते. जिल्हय़ात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आकसाने तडीपारीचे आदेश काढले जात आहेत, अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सतावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhau korgaonkar told bjp need shiv sena in state
First published on: 28-02-2015 at 03:30 IST