राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भिवंडी, पनवेल आणि मालेगाव महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. या महापालिकांसाठी २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या महापालिकांच्या क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मुंबईतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भिवंडी, पनवेल आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेचीही निवडणूक होत आहे. २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार असून, २६ मे रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जे. एस. सहारिया यांनी यावेळी दिली. भिवंडी महापालिकेच्या ९० जागांसाठी, तर नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या ७८ आणि मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांसाठी निवडणूक होत आहे. भिवंडी महापालिकेची १० जून तर मालेगाव महापालिकेची १४ जून रोजी मुदत संपणार आहे. निवडणूक आयोगाने ५ जानेवारीला विधानसभा मतदारसंघनिहाय प्रसिद्ध केलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महापालिका निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना २९ एप्रिल ते ६ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. परंतु १ मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी ८ मे रोजी होणार आहे. तर उमेदवारांना ११ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १२ मे रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मतदान २४ मे रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेतले जाणार आहे. मतमोजणी २६ मे रोजी होणार आहे.