संगमनेर: तालुक्यातील दुष्काळी भागाला भोजापूर चारीतून आलेल्या पाण्याचे जलपूजन काल, रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावरून आता राजकारण तापले असून, चारी काय आठ महिन्यात केली काय? आपणही अनेक वर्ष मंत्री आहात, यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले? या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना उद्देशून केला आहे. आता श्रेयासाठी पुढे सरसावणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारीसुद्धा माहीत नव्हती अशी टीकाही त्यांनी केली.
यासंदर्भात प्रसिद्धिपत्रकात थोरात यांनी चारीच्या आजवरच्या कामाचा संपूर्ण इतिहास कथित केला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून, कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार केली. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या कामामध्ये नेमके योगदान काय, असा प्रश्न त्यांनी पालकमंत्री विखे आणि आमदार खताळ यांना उद्देशून केला आहे.
सन १९७७ मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. १९९४ मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने खर्च करून व २००६ मध्ये कारखान्याची यंत्रणा व कामगारांनी श्रमदान करून तिगाव माथ्यापर्यंत चारी पूर्ण केली. २ ऑक्टोबर २००६ मध्ये पाणी पूजनही केले होते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
त्यानंतर आपण जलसंधारण मंत्री असताना २००८ मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतू पुल, काँक्रीट कामे व लांबी करता ५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. २०२१ मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्तीकरिता २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे कोणाचे योगदान आहे हे जनतेला सगळे माहीत आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
भूलथापांना लवकरच उत्तर देणार
आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले. भोजापूरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. सर्वांना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या, सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री थोरात यांनी दिला आहे.