Big shock Madhukar Pichad son defeat assembly elections factory also lost ysh 95 | Loksatta

मधुकर पिचड यांना मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीतील मुलाच्या पराभवानंतर कारखानाही गमावला 

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील २८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

मधुकर पिचड यांना मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीतील मुलाच्या पराभवानंतर कारखानाही गमावला 
मधुकर पिचड

प्रकाश टाकळकर

अकोले : ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील २८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव, माजी आमदार वैभव पिचड या दोघांनाही धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ज्येष्ठ नेते पिचड यांचा सहकार क्षेत्रातील हा पहिलाच पराभव. त्यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सक्रिय भूमिका बजावली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय पिचड यांच्या अंगलट आला. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवापाठोपाठ  आता कारखान्यातीलही सत्ता त्यांच्या हातून निसटली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतूनही वैभव पिचड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता, त्यामुळे पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, सहकारातील ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्यासह आपापसातील मतभेद विसरून पिचडविरोधक कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकवटले होते. त्यांचा आक्रमक प्रचार, प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे गेली काही वर्षे पिचड यांचे कारखान्याच्या कारभाराकडे झालेले दुर्लक्ष, आदिवासी भागातील मतदारांनी त्यांच्याकडे फिरवलेली पाठ, ३० वर्षांची प्रस्थापितविरोधी लाट, बहुजन समाजाचा अध्यक्ष हवा हा प्रचार, आम्ही कारखाना चालवू शकतो असा सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यात विरोधी महाविकास आघाडीला आलेले यश, अशा अनेक बाबी पिचड यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. परिणामी पिचड यांच्या पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही. आमदारकी असतानाही कारखान्याचे अध्यक्षपद, तालुका दूध संघाचे अध्यक्षपद, तालुका शिक्षण संस्थेचे विश्वस्तपद त्यांनी स्वत:च्या कुटुंबातच ठेवले. पिचड कुटुंबातील सत्तेच्या केंद्रीकरणाविरुद्ध लोकांच्या मनात नाराजीची भावना होती.

पक्षांतरामुळे नाराजी

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय मतदारांनी स्वीकारला नव्हता. अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असला तरी सुमारे ५० टक्के लोकसंख्या बिगरआदिवासींची आहे. कारखान्याच्या सभासदांमध्ये बहुसंख्य सभासद बहुजन समाजाचे आहेत. मात्र मागील २८ वर्षांत पिचड यांनी बहुजन समाजाच्या एकालाही कारखान्याचे नामधारी का होईना, अध्यक्ष केले नाही याची बोच अनेकांच्या मनात होती.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य असतानाही पिचड पिता-पुत्रांनी अनाकलनीय निर्णय घेत भाजपची वाट धरली. विधानसभा निवडणुकीत याचा फटका वैभव पिचड यांना बसला. त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. राज्यातील सत्ताबदलानंतर पिचडांची अनेक वर्षे साथ करणारे सीताराम गायकर यांच्यासह त्यांच्याजवळचे सर्वच खंदे समर्थक त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या तंबूत एकेक करीत डेरेदाखल झाले. वर्षांनुवर्षे राजकारणात साथ करणारी जिवाभावाचे कार्यकर्ते सोडून गेल्यामुळे या निवडणुकीत पिचड पिता-पुत्र एकटे पडले होते. निवडणूक जिंकण्याच्या तंत्रात तरबेज असणारे त्यांचे एके काळचे सर्व शिलेदार त्यांच्याविरुद्ध एकवटले. गुरूला शिष्य भारी ठरले.

विरोधक आक्रमक

पिचडविरोधी महाविकास आघाडी सुरुवातीपासूनच आक्रमक होती. पिचड पिता-पुत्रांचा कारभार आणि त्यांची एकाधिकारशाही हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. कारखाना निवडणूक काळात तालुक्यातील काही पतसंस्थांची चौकशी सुरू झाली. या पतसंस्थांनी कारखान्याला वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. निवडणूक प्रचारात हाही मुद्दा महत्त्वाचा ठरला. कारखान्याचा अध्यक्ष बहुजन समाजाचा हवा यावरही प्रचारात जोर दिला जात होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रचार सभेस मिळालेला प्रतिसाद वाऱ्याची दिशा स्पष्ट करणार होता.

याउलट पिचड गटाच्या प्रचारात उत्साह व जोश यांचा अभाव जाणवत होता. दीड तपापेक्षा अधिक काळ राजकारणात असूनही वैभव पिचड यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली नाही. त्यामुळे पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर नाइलाजाने नवख्या उमेदवारांना संधी द्यावी लागली. बहुसंख्य उमेदवार नवीन असल्यामुळे निवडणूक तंत्रात कच्चे होते.

राजकीय जीवनाची सुरुवातही पराभवानेच

राजकारणात कधी थांबायचे हे भल्याभल्यांना समजत नाही. ८१ वर्षांचे वय आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता पिचड यांनी या निवडणुकीत उभे राहायला नको होते, असे अनेकांना वाटत होते; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आयुष्यातील सहकारातील पहिल्या पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातही पराभवाने झाली होती. सन १९७८ मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक इंदिरा काँग्रेसच्या वतीने लढविली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र त्यानंतर सलग सात निवडणुका त्यांनी जिंकल्या. अगस्ती कारखान्यावर मोठे कर्ज आहे. संचालक मंडळात अनेक महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आता सभासदांनी त्यांना मोठा विजय मिळवून दिला. सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम कारभाराची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. त्या पूर्ण होतील का, याकडे आगामी काळात लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अलिबागकरांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अधांतरीच; सत्तासंघर्षांत लोकहिताचा विषय पुन्हा एकदा अडगळीत

संबंधित बातम्या

“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका
“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!
VIDEO : “तू तुझ्या औकातीत राहा, मला…”, ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात भर बैठकीत खडाजंगी
“पक्षाने आदेश द्यावा, मी बेळगावात घुसून…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं शहाजी बापूंचं विधान चर्चेत!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश