सोलापूर : हाॕटेलमध्ये दारू पिताना एकमेकांना पाहण्यावरून झालेल्या भांडणात एका बिहारी कामगाराला तिघाजणांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सोलापुरात अशोक चौकानजीक जुना कुंभारी नाक्यावरील हाॕटेल बी प्रकाश बारमध्ये हा प्रकार घडला. मुनाकुमार रामधर सिंह (वय ४४, रा. पागर, ता. रतिगंज, बिहार) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी नित्यानंद परमेला (वय २९), सागर रमेश पवार (वय २३) आणि दिगंबर विटकर या तिघा तरूणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी नित्यानंद परमेला आणि सागर पवार यांना अटक करण्यात आली असून फरारी झालेल्या दिगंबर विटकर याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जसे दिसते, तसे…”
मृत मुनाकुमार सिंह हा अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील अरिहंत टेक्स्टाईल इंडस्टूरीज या चादर व टाॕवेल निर्मिती कारखान्यात कामावर होता. कारखान्याजवळ एका खोलीत तो एकटाच राहायचा. त्याला दारूचे व्यसन होते. तो सत्तर फूट रस्ता-जुना कुंभारी नाका येथे हाॕटेल बी प्रकाश परमीट बारमध्ये रात्री दारू पिण्यासाठी गेला होता. तेथे समोरच्या टेबलावर तिघे तरूण दारू पित होते. परंतु एकमेकांना पाहण्यावरून त्यांच्यात चकमक उडाली. त्यातूनच तिघाजणांनी मुनाकुमार यास बेदम मारहाण करीत हाॕटेलबाहेर आणले आणि पुन्हा जबर मारहाण केली. यात मुनाकुमार गंभीर जखमी झाला. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर हे पुढील तपास करीत आहेत.