सातारा : महाबळेश्वर केट्स पॉइंट्सवर लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जैव संपदा, दुर्मिळ वृक्ष औषधी वनस्पती जळून खाक झाल्या. यामुळे परिसरातील स्थानिकांनी वन विभागावर संताप व्यक्त केला आहेसर्वत्र सुरू असणारे वनव्याचे सत्र यावेळी महाबळेश्वर पाचगणी येथेही होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदेला धोका निर्माण झाला आहे.
केट्स पॉईंट्स परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी व दुर्मीळ वनसंपदा आहे. शनिवारी दुपारी अज्ञाताने येथे गवताला लागलेल्या आगीमुळे अनेक दुर्मीळ वनस्पती वृक्ष आगीत सापडले. येथे वनविभागाचा नाका असतानाही नाक्यापासून अगदी पन्नास मीटर अंतरावर केट्स पॉईंट्सवर वणवा लागला. आग आटोक्यात आणण्याची येथे कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती.
वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच महाबळेश्वर येथे साताऱ्यातील सर्व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वणव्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. ते जाताच महाबळेश्वर येथेच मोठ्या प्रमाणात वणव्यामध्ये दुर्मीळ औषधी वृक्ष, जैव संपदा जळून गेली. त्यामुळे अनेक जीवांचा आधिवास अडचणीत आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाची जाळी असल्याने अनेक छोट्या मोठ्या पक्षांचे, सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास आहे. तो यामुळे धोक्यात आला आहे.
वन विभागाकडून येथे वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रवेश शुल्क आकारले जाते. या शुल्कातून पर्यटकांसाठी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पॉईंटची देखभाल केली जाते. परंतु, येथे सुरू असलेले वनव्याचे सत्र आटोक्यात आणण्यास वनविभागाला अपयश आले आहे. मात्र, आग लागल्यानंतर आगीचे व्यवस्थापन करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगीचे तांडव पाहायला मिळाले. यामुळे अनेक दुर्मीळ वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी जळून गेलेले दिसून आले. या ठिकाणी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन विभागाने दुर्मीळ व देशी जंगलातील वृक्षाची लागवड करून पुन्हा हा संपूर्ण परिसर हिरवागार करावा. – संतोष बावळेकर, शेतकरी.