इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तर या कारवाईवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे बाण डागले आहेत.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “बारा आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय; आम्ही त्या सभागृहात नव्हतो. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यांची अशी भूमिका आहे की, त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये.

“आता बारा आमदारांचं निलंबन झालेलं आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल’, असं राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा- Maharashtra Assembly Monsoon Session : भाजपचे १२ आमदार निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभागृहात बोलू दिलं जात नव्हतं, असं भाजपाचं म्हणणं आहे. त्यावर राऊत म्हणाले, “मूळात बोलू दिलं जात नाही, असं मला वाटत नाही. सभागृह विचार मांडण्यासाठीच असतं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’; बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालत नाही,” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.