सातारा : राज्याला आणि साताऱ्याला उत्कंठा लागलेला पालिकेच्या जागा वाटपाचा आणि नगराध्यक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. सातारा नगराध्यक्षपदासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक अमोल मोहिते यांचे नाव भाजपकडून जाहीर करण्यात आले. यामुळे आता उदयनराजे कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या जागा वाटपाबाबत सर्वांना उत्कंठा होती. शहरात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र जागावाटप होऊन खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या एक आणि नगरसेवक पदाच्या पन्नास जागांसाठी जागावाटप झाले.
उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाला प्रत्येकी २२ तर मूळ भाजपाच्या कार्यकर्त्यांना सहा जागा देण्यात आल्या. नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजेंनी आग्रह धरला होता. मात्र दोघांमध्ये निर्णय होत नसल्याने पक्ष पातळीवर कळविण्यात आले. यामध्ये पक्षश्रेष्ठींकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना झुकते माप देण्यात आले. या पदासाठी शिवेंद्रसिंहराजे समर्थक माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की आमच्या दोघांमध्ये जागावटपाचे कोणतेही सूत्र ठरलेले नव्हते. दोघांनी एकत्र बसून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे वाटप केले आहे. पक्षाकडे ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. सर्वजण तगडे उमेदवार होते. मात्र त्यांच्यातून योग्य उमेदवार निवडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे थोडा वेळ गेला. नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे कोणत्याही गटाचे नसून फक्त भाजपाचे आहेत. भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल. महाविकास आघाडीकडून सुवर्णा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत. मात्र त्यांच्या चिरंजिवांनी शिवसेना शिंदे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे भाजपा विरुद्ध शिवसेना अशी महायुतीतच लढत होणार आहे.
वाईत मकरंद पाटलांना धक्का
वाई, पाचगणी, महाबळेश्वर या तीन पालिका मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात येतात. महाबळेश्वर येथे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश घेऊन उमेदवार निवडणुकीत उतरविले आहेत. वाई येथे मकरंद पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून डॉ. नितीन कदम हे उमेदवार आहेत. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील पालिकांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
