मोहन अटाळकर

बोराळा (जि. वाशीम) : भारतातील आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांच्या हितांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते. पण या संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे. शिक्षण व्यवस्था असो किंवा वैद्यकीय सेवा, सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण सुरू आहे. मुलांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवेल जात आहे. दुसरीकडे भाजप सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग त्यांच्या एकदोन मित्रांच्या स्वाधीन करीत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी मंगळवारी भारत जोडो यात्रेदरम्यान सभेत केली. वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर पदयात्रेचे आगमन होताच अमरावती येथील रामराज्य ढोलताशा पथकातील सदस्यांनी चाळीस ढोल वाजवून यात्रेकरूंमध्ये उत्साह निर्माण केला. कनेरगाव नाका येथे हजारो कार्यकर्ते, कला संच आणि ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत केले.

 बोराळा हिसे या गावानजीक थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, आदिवासींच्या अधिकारासाठी आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे. पण त्यांच्या विचारांवरच आज आक्रमण केले जात आहे.  आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते. वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते. पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आले आहेत.

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना जाणीवपूर्वक वनवासी संबोधते. आदिवासी  ही छोटी गोष्ट नाही. आदिवासी हेच खरे मूळ मालक आहेत. तेच सर्वप्रथम या देशात आले होते, पण आता त्यांनाच मूलभूत हक्कांपासून वंचित केले जात आहे. आदिवासींना वनवासी संबोधून त्यांना चांगल्या शिक्षणापासून, सोयीसुविधांपासून दूर करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, आणि तो काँग्रेस पक्ष निश्चितपणे हाणून पाडेल, असेही राहुल म्हणाले. 

१७ वर्षांनंतर कलावतीशी भेट

चंद्रपूर : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या महिलेची १७ वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विदर्भात दाखल झाले आहेत. वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळय़ात कलावती बांदूरकर यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले.

सायकलने कोल्हापुरातील कार्यकर्ता जाणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिक पदयात्रेत दाखल झाले आहेत. याच क्रमात कोल्हापूर येथील नितीन गणपत नागनुरकर हे सायकल चालवत या यात्रेत सहभागी झाले.  सायकल चालवत श्रीनगर पर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.