scorecardresearch

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?; शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे त्यामुळे मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले

Bjp Chandrakant Patil question after Sharad Pawar pimpri chinchwad metro trial

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मेट्रोचा प्रवास केला आहे. शरद पवारांनी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोनं प्रवास केला आहे. तसंच यावेळी शरद पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी असा मेट्रो प्रवास केला आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली होती. असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

“पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय असा माझा प्रश्न आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? ११ हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत. कोविडमुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? केंद्रात दहा वर्षे आणि महाराष्ट्रात १५ वर्षे राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का नाही केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा. महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प लांबला आहे. शरद पवारांना मला दोष द्यायचा नाही पण मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, पिंपरीतील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी शरद पवार यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला. दरम्यान, मेट्रोला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी कोणालाच दिली नव्हती. ऐनवेळी शरद पवार येणार आहेत अशी माहिती स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना देण्यात आली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रो विषयी सर्व माहिती घेतली असे वाघेरे यांनी सांगितलं आहे. यावेळी, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विशाल वाकडकर, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp chandrakant patil question after sharad pawar pimpri chinchwad metro trial abn

ताज्या बातम्या